टिओडी मराठी, पुणे, दि. 20 जुलै 2021 – भारतीय राज्यघटना आपल्याला हक्क व व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार देते. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवन विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करते. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या प्रणाली व पदांना विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे भारताचे भूतपूर्व सरन्यायाधीश य. वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त झालेल्या ऑनलाइन चर्चासत्रामध्ये ‘विद्यार्थी-भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक फणसाळकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, नितीन ठक्कर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. सदानंद फडके, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के . जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे आदी उपस्थित होते.
देशाचे भूतपूर्व सरन्यायाधीश य. वि. चंद्रचूड यांच्या दृष्टीने शैक्षणिक संस्थांशी सहकार्य व विद्यार्थ्यांशी संवाद, भारतीय राज्यघटनेचा अभ्यास या दोन बाबी महत्त्वाच्या होत्या.
भारत आणि जगातील अनेक समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, नेल्सन मंडेला यांच्यामुळे शिक्षणाचा विशेषाधिकार आपल्यास मिळालाय. त्यामुळे प्रगतीशील राजकारण, संस्कृतीची सांगड घालण्यात विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही चंद्रचूड म्हणाले.