TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 जुलै 2021 – पुणे जिल्ह्यामधील भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. याप्रकरणी एनआयएने आठ जणांविरुद्ध 10 हजार पानांचे आरोपपत्र विशेष एनआयए न्यायालयात दाखल केले आहे. आता याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. कारण, 2 ऑगस्टपासून या आयोगाचे कामकाज सुरू होणार आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला असून यात निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले आहे, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका खासदार शरद पवार यांनी घेतली होती.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाची मुदत एप्रिल महिन्यामध्ये संपली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ देण्यात अली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे काम ठप्प होते. आता 2 ऑगस्टपासून या आयोगाचे कामकाज सुरू होत आहे. त्यामुळे याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत.

सध्या न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे कोरेगाव भिमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष आहेत. शरद पवार यांची ही साक्ष नोंदवली जाणार आहे, असं या अगोदर सांगण्यात आलं होतं. आता, चौकशी आयोगाचे वकिल आशिष सातपुते यांनी 2 ऑगस्टपासून साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात येत आहे, असं सांगितले आहे.

दोषारोप पत्रात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांचं नाव नाही :
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी एनआयएने पहिले दोषारोपपत्र नोव्हेंबर, २०१८ मध्ये विशेष न्यायालयात दाखल केले आहे.

त्यात सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, डॉ. शोमा सेन, प्रा. रोना विल्सन आणि महेश राऊत यांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर, फेब्रुवारी, २०१९ मध्ये पहिले पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले.

कवी वरावरा राव, अ‍ॅड.सुधा भारद्वाज, सामाजिक कार्यकर्ते अरुण फेरारी व वेर्नोन गोन्साल्व्हिस यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र होते. या दोन्ही दोषारोपपत्रात संभाजी भिडे आणि मलिंद एकबोटे यांची नावे नाहीत, असे समजते.