टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 2 जुलै 2021 – कर्जाचे ओझे असलेल्या पुण्यातील डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स अर्थात डीएसके या कंपनीला कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांची बैठक शनिवारी होणार आहे. डीएसकेच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी काही बोली आल्यात. या बोलीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. यात देणेकऱ्यांना 1,750 कोटी रुपयांचे येणे अपेक्षित आहे.
डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स कंपनीने शेअर बाजाराला समजलेल्या माहितीत म्हटले आहे की, शनिवार, दि. 3 जुलै रोजी कर्ज देणाऱ्या संस्थांच्या समितीची बैठक होणार आहे. नादारी आणि दिवाळखोरी सहितेअंतर्गत झालेल्या कारवाईनंतर तीन खरेदीदारांनी बोली लावलीय. त्यात मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स आणि सॉलीटायर समूहाचा समावेश आहे, असे समजते.
ही प्रक्रिया सुरू करण्याची सूचना सप्टेंबर 2019 मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने दिली होती. ही प्रक्रिया नादारी आणि दिवाळखोरी संहिता 2016 अंतर्गत सुरू केली आहे. यासाठी महाराष्ट्र बॅंकेने देखील अर्ज केला होता.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालमत्ता खरेदी करण्यासाठी तीन कंपन्यांनी इच्छा दर्शविलीय. त्यांना शुक्रवारपर्यंत आपल्या अंतिम बोली बोलण्यास सांगण्यात आले आहे. त्यावर शनिवार, दि. 3 जुलै रोजी चर्चा होणार आहे.
मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स आणि सॉलीटायर समूहाने डी एस कुलकर्णी यांच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी इच्छा दर्शविलीय. तर एका तिसऱ्या कंपनीने एका प्रकल्पाला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केलीय.
विविध देणेकऱ्यांना 1,750 कोटी रुपयांचे येणे अपेक्षित आहेत. त्यात १२ बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांचे 1,050 कोटी रुपये आहेत. यात संस्थागत वित्तीय संस्थांना 66.7 टक्के इतका मतदानाचा अधिकार आहे. तर घर खरेदी करणाऱ्यांना व ठेवीदारांना मतदानाचा 17 टक्के अधिकार आहे.