TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जुलै 2021 – ईडीकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केलाय. हा साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा आहे.

ईडीने केलेल्या या कारवाईमुळे अजित पवारांना मोठा झटका बसला आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केलीय. जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयातही सुनावणी सुरूय.

जरंडेश्वर साखर कारखान्याने बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त केला होता. माजी आमदार आणि महलूसल मंत्री शालिनी पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या.

सातारा जिल्ह्यातील कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढला होता. शिखर बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता. मात्र, हा लिलाव हेतू पुरस्कृत असल्याचा आरोपही केला होता.

ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटींहून कमी होती, त्या कंपनीने हा 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साखर कारखाना खरेदी केला होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीने ही कारवाई केलीय.

याबाबत अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल करत कारवाई केलीय.