टिओडी मराठी, दि. 30 जून 2021 – भाजपचे विधान परिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ज्यांचे तीन खासदार आहेत, त्यांना मोठं कोण मानणार?. तुम्ही मानणार असाल तर मला त्याचं देणंघेणं नाही, अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीय. एका पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी पवारांवर टीका केली आहे.
भाजपचे विधान परिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, ही लोकशाही आहे. या राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. या राज्यात सर्व ओबीसी समाजापर्यंत जाणं, हे माझं काम आहे. मला ओबीसींचा नेता म्हणावं ,असं माझं म्हणणं नाही.
मात्र, महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. मूठभर लोकांकडून बहुजनांचा आवाज दाबला जातोय. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न होतोय. त्यांच्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, असे त्यांनी नमूद केलं आहे.
मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा!!, अशा शब्दांतही गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. ते पुढे म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात. आणि त्यामुळे पुढं कोणत्यातरी लावणात ससा सापडेल अशी अपेक्षा झाली आहे.
काही घराणी अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा आहे, मला सुसंस्कृतपणा माहित आहे. तुमच्या विरोधी बोलल्यानंतर सुसंस्कृतपणा दिसून येतो, मला तो शिकवू नका, असे म्हणत पडळकर यांनी बाळासाहेब थोरत यांच्या कन्येला प्रत्युत्तर दिलंय. तसेच यावरून राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी अद्याप तरी प्रतिउत्तर दिलेलं नाही, असं समजतंय.