टिओडी मराठी, बार्सिलोना, दि. 24 जून 2021 – अमेरिकेच्या तंत्रज्ञान विश्वातील उद्योजक आणि अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरु तसेच मॅकॅफीचे संस्थापक जॉन मॅकॅफी हे स्पेनमधील तुरुंगामध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. बार्सिलोनामधील एका तुरुंगामध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी केलेल्या आत्महत्येने तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ माजली आहे. ते 75 वर्षांचे होते.
तुरुंगामध्ये नऊ महिने राहिल्याने ते निराश झाले होते, अशी माहिती त्यांचे वकील झेवियर विलाब्ला यांनी दिलीय. स्पेनच्या उच्च न्यायालयाने नुकतीच जॉन मॅकॅफी यांच्या अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याला मंजुरी दिली होती.
जॉन मॅकॅफी यांनी जगातील पहिले कमर्शिअल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ‘मॅकॅफी’ बनवले होते. ‘जर मला अमेरिकेत दोषी ठरवले तर संपूर्ण आयुष्य तुरुंगामध्ये घालवावं लागेल,’ असे त्यांनी गेल्या महिन्यात कोर्टातील सुनावणीवेळी म्हटले होते. ‘स्पॅनिश कोर्टाला हा अन्याय दिसेल, अशी मला आशा आहे. अमेरिका मला एका उदाहरणाप्रमाणे वापरु इच्छतो,’ असे ते म्हणाले होते.
जॉन मॅकॅफी अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या प्राधिकरणांपासून पळ काढत होते. काही काळ ते आपल्या यॉटवर राहिले. मॅकॅफी यांच्यावर करचोरीचा आरोप आहे. टेनेसी आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.
गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी जॉन मॅकॅफी यांना बार्सिलोना विमानतळावरुन ताब्यात घेतले होते. ब्रिटिश पासपोर्ट वापरुन ते इस्तांबूल येथे जात होते. जॉन मॅकॅफी यांनी NASA, Xerox आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या कंपन्यांसाठी काम केलं होते. 1987 मध्ये त्यांनी जगातील पहिले कमर्शिअल अँटी-व्हायरस बनवले होते.
जॉन यांनी 2011 मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेलला विकली होती. त्यानंतर ते या व्यवसायात नव्हते. मात्र, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आताही त्यांच्या नावाने सुरु आहेत. जगात सुमारे 50 कोटी यूजर या अँटी व्हायरसचा वापर करत आहेत. जॉन मॅकॅफी यांनी 2019 मध्ये म्हटले होते की, वैचारिक कारणांमुळे त्यांनी 8 वर्षांपासून अमेरिकेला आयकर दिला नाही.