टिओडी मराठी, गुवाहाटी, दि. 20 जून 2021 – आसाम राज्याला शनिवारी भूकंपाचा धक्का बसला आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.2 इतकी नोंदली आहे. ईशान्य विभागातील 24 तासांतील तो भूकंपाचा पाचवा धक्का ठरला आहे.
सुदैवाने त्यामध्ये कुठलीही जीवित तसेच वित्तहानी झालेली नाही. आसाममध्ये शुक्रवारी दोन भूकंपांची नोंद झाली असून त्यातील एक 4.1 तीव्रतेचा होता. त्याशिवाय, मणिपूर आणि मेघालयलाही शुक्रवारी भूकंपाचा धक्का बसला आहे.
रिश्टर स्केलवर मणिपूरमधील भूकंपाची तीव्रता 3, तर मेघालयातील भूकंपाची तीव्रता 2.6 इतकी नोंदवली आहे. ईशान्य विभाग भूकंपप्रवण मानला जात आहे.
त्यामुळे त्या विभागातील राज्यांना वारंवार भूकंपाचे धक्के बसत असतात. यादरम्यान, भूकंपाच्या ताज्या मालिकेत कुठलीही हानी न झाल्याने ईशान्य विभागाला दिलासा मिळाला आहे.