टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 जून 2021 – मागच्या वर्षी देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले होते. याच परिस्थितीत दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेले तबलिगी जमात मरकज प्रकरणाने खूप गोंधळ उडवला होता. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमानंतर उपस्थित असलेले लोक वेगवेगळ्या राज्यात परतल्याने करोना प्रसारासाठी या घटनेला जबाबदार धरले होते. या घटनेबद्दल केलेल्या वार्तांकनावरून तीन वृत्तवाहिन्यांना दंड ठोठावला आहे.
न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड अथॉरिटी अर्थात ‘एनबीएसए’ने ही कारवाई केलीय. त्यासह प्रेक्षकांची माफी मागण्यासही सांगितले आहे. दिल्लीत तबलिगी जमातचा धार्मिक कार्यक्रम झाला होता. १३ ते २४ मार्चच्या दरम्यान निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातच्या सुमारे १६,५०० लोकांनी भेट दिली होती.
त्यानंतर ३० मार्च रोजी हा परिसर सील केला होता. त्यानंतर करोना प्रसाराचा ठपका या कार्यक्रमावर ठेवला होता. याचदरम्यान काही वृत्तवाहिन्यांनी आक्षेपार्ह वार्तांकन केले आहे, असे मत विविध न्यायालयांनी नोंदवले होते. त्यानंतर आता एनबीएसने ही कारवाई केलीय.
तबलिगी जमातीविषयी केलेले वार्तांकन अत्यंत आक्षेपार्ह आणि केवळ अंदाजावर आधारित होते, असे एनबीएसएने म्हटले आहे. ‘वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केलेल्या कार्यक्रमाची भाषा असभ्य होती. त्यासह त्यात पूर्वग्रहदूषितपणा आणि आपत्तीजनक होती.
कार्यक्रमातील भाषा चिथावणी देणारी होती. धार्मिक भावनांचा विचार न करता आणि सामाजिक सौहार्दतेची चौकट तोडणारी होती. सामाजिक तेढ निर्माण करून त्याला चिथावणी आणि प्रोत्साहन देणारी भाषा होती,’ असे एनबीएसएने म्हंटलं आहे.
त्या वृत्तवाहिनीने माफी मागावी :
याप्रकरणी एनबीएसएने एका वृत्तवाहिनीला एक लाख, तर दुसऱ्या प्रादेशिक वृत्तवाहिनीला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. १ लाख रुपये दंड ठोठावण्यासह संबंधित वृत्तवाहिनीने या कार्यक्रमाबद्दल २३ जून रोजी रात्री ९ वाजता प्रसारित केल्या जाणाऱ्या बातमीपत्राच्या अगोदर प्रेक्षकांची माफी मागण्याचे निर्देशही दिलेत.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीलाही या प्रकरणात दोषी धरले आहे. तसेच या वृत्तवाहिनीलाही दंड ठोठावला आहे. या इंग्रजी वृत्तवाहिनीने तबलिगी जमात कार्यक्रमाबद्दल आणि नंतर प्रसारित केलेली दृश्य जुळत नाहीत, असेही एनबीएनएने स्पष्टपणे नोंदवलं आहे.