टिओडी मराठी, पुणे, दि. 8 जून 2021 – मुळशी तालुक्यातील पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील एका रासायनिक कंपनीत सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश असून त्यांचे मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी या मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) घेतले जाणार आहेत. डीएनए चाचणी तसेच रक्तांच्या नमुन्याद्वारे मृतांची ओळख पटविण्यात येणार आहे, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे.
मृतांची लवकर ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. पुण्यातील पाषाण रस्त्यावर असलेल्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेसह नाशिक, औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने पाठविले जाणार आहेत. घटनास्थळी एका मृतदेहाचा अवशेष सापडला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
पौड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.तर मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. पोलीस ठाण्याच्या परिसरातील वातावरण शोकाकुल झाले होते.
डीएनए चाचणीसाठी ससून रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना बोलावले होते. मृतांचे नातेवाईक सकाळी ७ वाजल्यापासून नमूने देण्यासाठी हजर होते. मात्र, सायंकाळी ६ पर्यंत फक्त कागदपत्रांचे सोपस्कर सुरु होते. यामुळे नातेवाईकांचे डीएनएसाठी नमूने घेतले नाहीत. अगोदर दुखात असलेले नातेवाईक यामुळे संतप्त झाले होते.