टिओडी मराठी,दि. 26 मे 2021 – नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनरक्षक संतोष चाळके यांना दुर्मिळ ग्रिफॉन गिधाड हा घिरट्या घालताना आढळला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडाची पहिल्यांदा नोंद झालीय. त्याला वनरक्षक संतोष चाळके यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे.
ग्रिफॉन गिधाड हा पक्षी तिबेट, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान,अफगाणिस्तान, पाकिस्तान ते हिमालय नेपाळ, भूतान, पश्चिम चीन आणि मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका या भागात प्रामुख्याने आढळतो.
ग्रिफॉन गिधाड हा पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतो. आकाशात उंच घिरट्या घालत आपले अन्न शोधतो. या पक्ष्याचे इंग्रजी नाव ‘ग्रिफॉन वलचर’ असे असून शास्त्रीय नाव ‘गीप्स फुल्वस’ असे आहे. ग्रिफॉन गिधाड हा एक अत्यंत मोठा पक्षी असून त्याची उंची साधारणपणे 125 से.मी. असते. तर दोन पंखांची लांबी साधारण 8 ते 9 फुटापर्यंत असते. नर आणि मादी ग्रिफॉन गिधाडाचे वजन 8 ते 10 कीलोग्रम पर्यंत नोंदवले आहे.
ग्रिफॉन गिधाड ही एक दुर्मिळ गिधाड प्रजाती असून त्याचे डोक्यावर पंख पांढरे शुभ्र असतात. तर पाठीवरचे पंक फार रुंद आणि तांबूस असतात. शेपटीचे पंख हे डार्क चॉकलेटी असतात. इतर गिधाडांप्रमाणे हा स्केवेंजर, कुजलेले आणि सडलेले मांस खाणारा पक्षी आहे. ही गिधाडं पर्वतांमध्ये ते प्रजनन करतात आणि एक अंडे देतात.
वनरक्षक संतोष चाळके यांनी अभ्यासाठी हा फोटो पक्षी तज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिलाय. फोटोत या गीधाडावर उजव्या पंखावर नारंगी टॅग लावलेले आढळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदिप कुंभार यांनी संतोष चाळके यांचे या दुर्मिळ नोंदणीसाठी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
दुर्मिळ गिधाड हे शास्त्रीय आणि स्थलांतराचे अभ्यासाठी कोणत्यातरी अभ्यासकाने हे टॅग लावून सोडले आहे. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशात गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना आणि गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थाना संपर्क करून त्यांना या नोंदीची माहिती आम्ही कळवली आहे, असे पक्षी तज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले आहे.