टिओडी मराठी, पुणे, दि. 17 मे 2021 – थोडा खोकला जाणवला तरी डॉक्टर कोरोना टेस्ट करायचा सल्ला देतात. कोरोना टेस्टसाठी भरपूर पैसे लागत होते म्हणून अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक टेस्ट करायची कि नाही ? हा विचार करत होते. पण, आता 100 रुपयांत कोरोना टेस्ट करता येणार आहे. पतंजली फार्माचं कोरोना टेस्ट किट बाजारात आणलं आहे.
मुंबईत रॅपिड अँटिजेन टेस्ट किट तयार केलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत डीएसटीच्या मदतीने मुंबईतील स्टार्टअप कंपनी पतंजली फार्माने स्वस्तात किट तयार केलंय. पतंजली फार्माने तयार केलेलं हे किट गोल्ड स्टँडर्ड आरटीपीसीआर टेस्ट किट आणि सध्या असलेल्या रॅपीड अँटिजेन टेस्टसारखं असणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका आता ग्रामीण भागाला अधिक आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केलीय. यात चाचण्यांवर अधिक भर द्यावा, असं सांगितलं आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
मुंबईतील या स्टार्टअपने तयार केलेलं कोरोना टेस्ट किट हे खूप स्वस्त आहे. यासाठी आयआयटी मुंबईचीसुद्धा मदत झालीय. टेस्ट किटची किंमत एका चाचणीसाठी 100 रुपये इतकी आहे. केवळ 100 रुपयांत मिळणाऱ्या या किटमधून रिपोर्ट तयार होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत सेंटर फॉर ऑगमेटिंग वॉर विथ कोविड 19 हेल्थ क्रायसिसने जुलै 2020 मध्ये कोविड 19 रॅपिड टेस्ट किट तयार करण्यासाठी स्टार्टअपला आर्थिक सहाय्य केलं होतं.
पतंजलि फार्माचे संचालक डॉक्टर विनय सैनी यांनी सांगितले कि, एसआयएनई, आयआयटी मुंबईसह स्टार्टअप सुरु केला. आणि त्यांनी 8 ते 9 महिन्यांत संशोधन प्रयोगशाळा व विकास यासह उत्पादन निर्मिती केली. त्यासाठी आवश्यक परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले. वेगवेगळ्या कोरोना सेंटरमध्ये असलेल्या प्रोडक्टचे मूल्यांकन आणि पडताळणी केली. त्यातून उत्पादनांमुळे उपचारात कितपत मदत होते आणि त्यात काय सुधारणा गरजेच्या आहेत ,याची माहिती मिळाली.
कोरोना तपासणी किट तयार करण्याबाबत विनय सैनी यांनी सांगितलं की, कोरोना रुग्ण व व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियनच्या नमुन्यांमध्ये आमच्या उत्पादनांची अंतर्गत पडताळणी करणं हा एक वेगळा आणि अद्भुत अनुभव होता. यात कोरोना रुग्णांच्या स्वॅबचा समावेश होता. यावेळी मुंबईतील वेगवेगळ्या कोरोना केंद्रांवर चाचणीवेळी कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित राहून त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम केलंय.
नवीन किटच्या मदतीने अँटिजेन चाचणीला सुरुवात जून 2021 पासून करण्याचा प्लॅन आहे. रॅपिड टेस्ट 10 ते 15 मिनिटात होत आहे. ग्रामीण भागात, डॉक्टरांचे क्लिनिक आणि जिथं पॅथॉलॉजी, डायग्नोस्टिक लॅब नाहीत, अशा ठिकाणी या किटची मदत होणार आहे. किट स्वस्त असल्याने परवडेल आणि कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल.