टिओडी मराठी, पुणे, दि. 16 मे 2021 – कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारने दि. 30 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करून याबाबतचे निर्बंधही कडक केले आहेत. सुधारित नियमावलीनुसार संचारबंदीच्या काळातील कारवाई करण्यासह महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या सर्व मालवाहतूक वाहनांसाठी 48 तास अगोदर आरटी-पीसीआर टेस्ट करणे तसेच त्याबाबतचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केले आहे.
महाराष्ट्र शासनाने सदर नियमाची कडक अंमलबाजावणी करण्याबाबतचे आदेश दिलेत. या निर्णयामुळे राज्यातील सीमेवरील सर्वत्र आरटीओ चेक पोस्ट उभारले आहेत. यामुळे पुणे शहराकडे मालवाहू ट्रक राज्याच्या सिमेवर अडकलेत.
आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक असल्याने ती करण्यासाठी ऐनवेळी चालकांची धावपळ होत आहे. यातून किलोमीटर ट्रकच्या लांबच लांब रांगा राज्याच्या सीमेवर लागल्या आहेत. यामुळे वाहतूकदारांना माल वेळेत पोहचविणे अडचणीचे ठरत आहे. यात जीवनावश्यक वस्तू तसेच औषधांचाही समावेश आहे. याच कारणातून बाजारपेठेत काही गोष्टींचा तुटवडाही जाणवू लागलाय.
मालवाहू वाहनांचे चालक सतत प्रवास करीत असतात. त्यामुळे वारंवार आरटी-पीसीआर टेस्ट करणे अडचणीचे होणाराय. याबाबत राज्य सरकारने राज्यातील सर्व चेक पोस्टवर हि टेस्ट करण्याबाबतची यंत्रणा उभी करावी. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे सदस्य बाबा शिंदे यांनी सांगितले आहे.