एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला ‘वडापाव’ हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. प्रसाद ओक पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. प्रसाद दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘वडापाव’ असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे. लंडनमध्ये नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त सोहळा संपन्न झाला. आता प्रतिक्षा आहे ती जगप्रसिद्ध असलेला रुचकर वडापाव चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडणार याची.
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ चित्रपटात सविता प्रभुणे,गौरी नलावडे,अभिनय बेर्डे,रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी ‘वडापाव’ चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.
हेही वाचा” …यशस्वीचे पदार्पण; पहिल्या कसोटीसाठी रोहितने सांगितली प्लेइंग इलेव्हन, पहा”
दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाविषयी सांगतात की प्रेमाला,लग्नाला आणि वडापाव खाण्याला वयाचं बंधन कधीही नव्हतं,नाही आणि नसेल. असं म्हणतात की “पुरुषाच्या मनात जाण्याचा रस्ता पोटातून जातो.” ह्या घरातल्या पुरषांच्या मनापर्यंत जाण्याच्या रस्त्यावर अनेक चमचमीत आणि झणझणीत जिन्नस आहेत, त्याची चव घ्यायला तयार रहा.
या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत,प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर चित्रपटाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल,सनिस खाकुरेल हे आहेत. या चित्रपटाचे लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तसंच,चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांच्याकडे आहे.संगीतकार कुणाल करण ‘वडापाव’ या आगामी चित्रपटाचे संगीतकार आहेत तर मंदार चोळकर हे गीतकार आहेत. तेव्हा तयार रहा घमघमीत वडापावची झणझणीत चव अनुभवायला