जळगाव | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. यानंतर जळगाव पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि महानगर प्रमुख अशोक लाड वंजारी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. रोहिणी खडसे यांना ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले, “शासनाच्या माध्यमातून पोलिसांची ही दडपशाही सुरू आहे. वास्तविक कुणीही काळे झेंडे दाखवले नाहीत किंवा ते रस्त्यावरही उभे नव्हते. ज्यांना ताब्यात घेतलं ती सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसले होते. असं असताना पोलिसांनी कार्यालयात धुडगूस घालून रोहिणी खडसेंना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. महिलांना जबरदस्तीने उचलून नेलं. हे काय सुरू आहे? ही काय हुकूमशाही आहे का?”
हेही वाचा” …औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे दंगली थांबल्या; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा”
रोहिणी खडसे यांना ताब्यात घेतल्यानंतर जळगाव पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कापूस दराच्या प्रश्नावरून आम्ही शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी दिला होता. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रोहिणी खडसेंना ताब्यात घेतलं आहे.