मुंबई | शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून 20 जून हा जागतिक गद्दार दिवस म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ते आज (२० जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलले.
राऊत म्हणाले, “आज मी संयुक्त राष्ट्राचे महासचिव, भारताचे पंतप्रधान कार्यालय यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र मी फार गांभीर्याने लिहिलं आहे. जगात फादर्स डे,(Father,s Day) मदर्स डे,(Mother,s DAy) व्हॅलेंटाईन दिवस, योगा दिवस असे अनेक प्रकारचे दिवस साजरे केले जातात. त्याचप्रमाणे जगाला गद्दारांची आठवण करून देणारा जागतिक गद्दार दिवसही साजरा करावा, अशी मागणी मी केली आहे.”
“जगातील सर्वात मोठी गद्दारी आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाली होती. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० लोकांनी गद्दारी केली. त्याचा काळा इतिहास सर्वांसमोर आहे. यापेक्षा मोठी गद्दारी जगात कधी झाली नाही. ज्या आईने पालनपोषण केलं, प्रतिष्ठा दिली त्याच आईच्या पाठीत खंजिर खुपसून गद्दार निघून गेले. यापेक्षा मोठी गद्दारी देशाच्या राजकारणात झाली नाही,” असं राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, “जगाच्या वेगवेगळ्या भागात अशाप्रकारची गद्दारी झाली असेल. मात्र, ही सर्वात भयंकर होती. अशा गद्दारांची आठवण म्हणून गद्दार दिवस असावा. आणि म्हणूनच मी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना २० जून हा जागतिक गद्दार दिवस म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. आणि ही मागणी जनतेची आहे.”
मी मोदींनाही (Narendra Modi)पत्र लिहिलं आहे. ते तिथं या मागणीचा पाठपुरावा करतील. गद्दार दिवस जाहीर करावा ही मोदींचीही जबाबदारी आहे. त्यांनी जागतिक योगा दिवसासाठी जसे प्रयत्न केले तसेच त्यांनी जागतिक गद्दार दिवसासाठीही प्रयत्न करावेत. कारण महाराष्ट्रात ही गद्दारी व्हावी यासाठी मोदींनीही प्रयत्न केले. या गद्दारीत त्यांचंही योगदान आहे.