या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Ex MP and Thackeray group leader Chandrakant Khaire) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. त्यांना एकत्र बांधून ठेवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून या सगळ्यांना गुवाहाटीला नेण्यात आले होते. तसेच नाराज आमदार फुटू नयेत म्हणून प्रत्येक आमदाराला पुन्हा प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले. यावर आता शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
या दौऱ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बहुचर्चित गुवाहाटी दौऱ्याला पाच आमदार आणि एका खासदाराने दांडी मारली होती. यामध्ये चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, महेंद्र दळवी आणि संजय गायकवाड आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. पण विशेष गोष्ट म्हणजे शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावेळी भाजपचे रवींद्र चव्हाण आणि मोहित कंबोज हे दोन नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. याचीही राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.