मुंबई :
“खासदार उदयनराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत. छत्रपतींच्या अपमानाने त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. (Udayanraje Bhosale’s emotion is an emotion of Maharashtra, says Sanjay Raut) शिवरायांचा अपमान सहन करण्यापेक्षा मरण का आलं नाही? ही उदयनराजेंची भावना म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रवासियाची भावना आहे”, असं खासदार संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता, किंवा राज्यपालांना परत पाठविण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्त्व वाढलं असतं, अशी आठवण करुन देत संजय राऊतांनी भाजपला कोंडित पकडलं आहे. (Sanjay Raut on CM Eknath Shinde)
किल्ले प्रतापगडावर ३६४ वा शिवप्रतापदिनाचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पण शिवछत्रपतींचा अवमान निमुटपणे ऐकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपतींना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा खोचक संजय राऊत यांनी विचारला. राज्य सरकारचा शिवप्रतापदिन सोहळा हे ढोंग आहे. जर राज्यपालांना हटवलं असतं आणि भाजप प्रवक्त्याला पदावरुन दूर केलं असतं तर शिवप्रताप दिनाचं महत्त्व वाढलं असतं, असं राऊत म्हणाले.
“महाराष्ट्राचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल अजूनही राजभवनात आहेत आणि मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार तोंड शिवून बसलंय. तिकडे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अजूनही त्यांच्या जागी बसलेत, त्यांच्यावरही कारवाई नाही, उलट त्यांचे नेते त्यांचं लंगडं समर्थन करतायेत. अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपतींना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न करत महाराजांचा अवमान होत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हतबलतेने पाहतंय आणि आज सरकार शिवप्रतापदिन साजरा उत्साहात साजरा करतंय, हे त्यांचं ढोंग आहे”, अशा शब्दात राऊतांनी शिंदे सरकारवर तोफ डागली.
उदयनराजे भावुक
छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याप्रकारे अपमान होतो आहे, तो दिवस पाहण्याआधी मी मेलो असतो तर बरं झालं असतं. शिवाजी महाराजांची ही अवहेलना पाहवत नाही, अशी खंत व्यक्त करताना उदयनराजेंच्या डोळ्यातून अश्रू आले होते. सोमवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे भावुक झाले होते. छत्रपती शिवरायांच्या अपमानाच्या मुद्द्यावरुन उदयनराजे भोसले अत्यंत व्यथित झालेले दिसले. उदयनराजे भोसले यांनी येत्या काही दिवसांत किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळावर जाऊन प्रतिकात्मक आंदोलन करणार असल्याचेही सांगितले. तसेच ते राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना भेटून या मुद्द्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.