मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चिखलफेक केल्यामुळे महाराष्ट्रात विद्यमान सरकारविरोधात संतापाची लाट आहे. यावरील लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पुढे करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं आहे. भाजपचे मुख्यमंत्री भाजपच्याच उपमुख्यमंत्र्यांविरोधात अशी भाषा करणं शक्य आहे का? हे सगळ स्क्रिप्टेड आहे, (Sanjay Raut targets BJP and Shinde group on border issue) असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मलाही भविष्य कळतं, पुढच्या दोन महिन्यांत त्यांच्या पत्रिकेत सत्तायोग नाही, असा टोलाही संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavraj Bommai) यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय, मी याला युद्ध म्हणतो, दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सुरु केलाय, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांवर चिखलफेक केली. त्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठीच बोम्मईंना पुढे केलंय, (Karnataka CM speaking is scripted, Its happening to divert public from Shivaji Maharaj issue) लोकांनी छत्रपतींचा अपमान विसरावा यासाठीच हे चाललंय, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.
उत्तर प्रदेश, गुजरात इथं असं पाहायला मिळतं का? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर, किंवा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर कधी हल्ला केलाय का? हा अत्यंत शिस्त पाळणारा पक्ष आहे. हे सारं नियोजितपणे सुरु आहे, हे सगळं स्क्रिप्टेड आहे, राज्यापालांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे, (Sanjay Raut criticized Governor Bhagatsingh Koshyari) असं राऊत म्हणाले.
तुम्ही कितीही कारस्थानं केलीत तरी राज्याची जनता विसरणार नाही. महाराष्ट्राची एक इंच भूमीही जाऊ देणार नाही. सरकार दुबळं आहे, पण शिवसेना नाही, टाका तुरूंगात आम्ही भित नाही. राज्याचा या खोके सरकारवर विश्वास नाही यांना खोके दिले की सारं विसरतात. मात्र उद्धव ठाकरेंनी याविरोधात आता रणशिंग फुंकलंय आणि हा लढा फार मोठ्या स्तरापर्यंत जाणार आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
गुवाहाटीला जाऊदेत किंवा लंकेत ४० आमदारांचे लोकांमधून नामोनिशाण नाहीसे झाले आहे. दोन महिन्यांनंतर त्यांच्या कुंडलीत सत्ता योग नाही मलाही कुंडली बघता येते, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. ज्यांना तंत्रमंत्र करायचेत, भविष्य पाहायचेत त्यांनी पाहून घ्या, त्यांच्या स्वत:वर विश्वास नाही, हे स्पष्ट होतं, अशी टीकाही अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.