गेल्या काही दिवसात मराठीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev movie controversy) हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या घटनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि प्रेक्षक यांच्यात हाणामारी झाली. आणि या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या घटनेवरून आता मनसे (MNS aggressive) आक्रमक झाली असून त्यांनी या घटनेवर टीका केली आहे. घडलेल्या प्रकारावर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले की “आम्हाला सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटासाठी परवानगी मिळाली आहे. आम्ही ऐतिहासिक पुरावे बोर्डाला दाखवून त्यांच्या परवानगीने हा चित्रपट बनवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाच्याबाबतीत अशी घटना घडणे ही दुर्दैवी गोष्ट आहे.
ज्या लोकांनी प्रेक्षकांना मारहाण केली त्यांनी माफी मागावी. ज्या शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून समजतो, ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र आणलं, त्यांना माणुसकीचा संदेश दिला. तेव्हाच आपण एकमेकांसमोर जाऊन एखाद्या कुटुंब प्रमुखाला मारहाण करतो हा खरं तर छत्रपतींचा अपमान करतो आहोत. म्हणूनच मारहाण करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची, छत्रपतींची जाहीर माफी मागावी.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या ऐतिहासिक संदर्भांवरून हा चित्रपट तयार केला आहे त्याचा उल्लेखदेखील केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले “चित्रपटाच्या बाबतची आमची भूमिका आम्ही मांडणार आहोत.