शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांनी महिला पत्रकाराशी बोलताना “आधी टिकली लावा, मग तुझ्याशी बोलतो” असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांचा निषेध करण्यात आला. अनेक पत्रकार महिलांनी देखील सोशल मीडियासह विविध माध्यमातून आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis’ wife Amrita Fadnavis ) यांनी देखील या विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
“भिडे गुरुजींबाबत मला आदर आहे मात्र महिलांनी कसं जगावं हे कुणी सांगू नये” असं त्यांनी म्हटलं आहे.
मंत्रालयात संभाजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या भेटीला आले होते. त्यांच्याशी भेट झाल्यानंतर एका महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता, त्यावर उत्तर न देता संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अनेक महिला पत्रकारांसह माजी मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur ), वर्षा गायकवाड यांनी या गोष्टीचा निषेध केला होता. त्या सोबतच राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील याबाबत तातडीने खुलासाही मागवण्यात आलेला आहे.
यापूर्वी देखील संभाजी भिडे यांनी विविध वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. कोरोना काळात कोरोना कोणाला होतो या संदर्भात असेल किंवा त्यांच्या शेतातील आंबा खाल्ल्यानंतर मुलं जन्माला येतात, अशा स्वरूपाची वादग्रस्त वक्तव्य यापूर्वी देखील त्यांनी केले होते.
त्यामुळे आता संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर ते महिला आयोगाने मागितल्याप्रमाणे खुलासा देतात का? हे बघावे लागणार आहे आणि त्यापुढे महिला आयोग काय भूमिका घेईल हेही कळणार आहे.