आज कार्तिकी एकादशी आहे. कार्तीकी एकादशी निमित्त आज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे यांना मानाचा वारकरी होण्याचा मान यांना मिळाला आहे. शासकीय सेवेतून सेवेतून निवृत झालेले साळुंखे कुटुंबं गेली 50 वर्ष सलग कार्तीकी वारी करत आहेत. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तीकी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी सावळ्या विठुरायाचे दर्शन सुरु करण्यात आले आहे. आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाला पिवळ्या रंगाचा पितांबर, अंगावर शेला असा पोशाख करण्यात आलाय. तसेच मस्तकी सोन्याचा मुकुट देखील ठेवण्यात आलाय.
कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरात चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे. पंढरपुरात हरी नामाचा जयघोष सुरू असून अवघी पंढरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलीये. विठ्ठल मंदिरावर आकर्षक अशी विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.