मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे लाखो गुरुदेव भक्तांनी तुकडोजी महाराजांना (Rashtrasant Tukdoji Maharaj) मौन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर गुरुकुंज नगरी श्री गुरुदेवच्या जयघोषाने दुमदुमली. सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आधुनिक काळातील महान संत म्हणून भारतासह जगभरात ओळख आहे. ग्रामगीतेतून ग्रामविकास, राष्ट्रहित, देशाच्या सीमेवर जाऊन शत्रूला खंजिरी कीर्तनातून परिवर्तन घडवणाऱ्या महान संताला दरवर्षी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.
त्यांच्या विचारांचे सर्व धर्म- पंथातील राष्ट्रसंत प्रेमी व भाविक या दिवशी तन्मयतेणं श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी (Gurukunj Mojhri) येथे एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करतात. गेल्या 53 वर्षापासून अविरतपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने यासाठी जय्यत तयारी केली जाते. राष्ट्रसंतांच्या भव्य दिव्य विश्वव्यापक कार्याची माहिती शब्द व सुरांच्या माध्यमातून उपस्थित जनसमुदायाला देण्यात आली. जवळपास दोन लाख लोकांचा जनसमुदाय राष्ट्रसंतांच्या विश्वात्मक विचार व कार्याचा त्यातून भासणाऱ्या त्यांच्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसलेला होता. महाद्वारावरील विशाल घंटेचा निनाद होताच बरोबर 4 वाजून 58 मिनिटांनी शिस्तबद्ध रीतीने गुरुदेव भक्तांनी महासमाधीस्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर आरती व सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली. विविध धर्मांच्या प्रार्थना देखील धर्मगुरूंकडून करण्यात आल्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही क्षणांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात येऊन दुकानातील व्यवहार देखील स्वतःहून बंद करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र निरव शांतता पसरली होती. (Great silence was observed)
दोन वर्ष कोरोना काळानंतर यावर्षी समाधी स्थळी असलेल्या मोठ्या प्रांगणात लाखो गुरुदेव भक्तांनी पांढरे शुभ्र वस्त्र आणि भगवी टोपी घालून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, जॉर्जिया, जर्मनी, कॅनडा, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशातील राष्ट्रसंत विचार प्रणालीचे अभ्यासक व परदेशी नागरिक आवर्जून उपस्थित होते. विविध देशातून आलेल्या जवळपास 20 भक्तांनी श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार बच्चू कडू, यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, नागरिक तथा गुरुदेव भक्तांचा लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.