दसरा मेळाव्यातील भाषण सगळ्यांनी बघितलं. उद्धव ठाकरेंचं ( Uddhav Thackeray ) शिवाजीपार्कवर आणि एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) बीकेसीतील मैदानावरील मेळाव्यात काय मार्गदर्शन केलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. आम्ही पण बघितलं. त्यांनी त्यांचे विचार सर्वांसमोर ठेवलं आहे. त्यांचे पक्षांतर्गत प्रश्न असल्याने सर्वांना उत्सुकता होती. कशी गर्दी होती, काय होती हे पण मीडियाने दाखवलं. चहा, मिळाला का, नाष्टा मिळाला का? हे मीडियाने दाखवलं, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांना चिमटा काढला.
मी दोघांचीही भाषणं ऐकली. आधी उद्धव ठाकरेंचं झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं झालं. दोघांनी काय भाषणं केली हे सर्वांनी पाहिलं.
अडीच वर्ष आम्ही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम केलं. त्यांचे विचार होते. आणि ठाकरे मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदेंसोबतही काम करत होते. मात्र या राजकीय बाबी आहेत. आता याबद्दल बारकाईने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेने, मतदारांनी आणि विशेषता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. पुढे काय केलं पाहिजे, भूमिका काय असली पाहिजे, कुणाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे, याचा विचार त्यांनी करावा, असं अजित पवार म्हणाले.
तुम्हाला कुणाचं भाषण आवडलं? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. तेव्हा ही काही आवडी-निवडी करता भाषणं नव्हती. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला मुंबईत यायचे, ही परंपरा आहे. पण दसरा मेळाव्यासाठी १० कोटी रुपये खर्च करून मेळाव्याला गर्दी जमा केली. यासाठी एसटी बससेचा उपयोग केला गेला. मात्र, अनेक एसटी बस दसरा मेळाव्यासाठी गेल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली. यामुळे अशा गोष्टी करता कामा नये. जनतेसाठी गाव तिथे एसटी हे धोरण राबलं गेलं. त्यांच्यासाठी एसटी आहे. आणि कशा प्रकारे वापर झाला हे दिसलंच, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावला. दसरा मेळाव्यात काहींची भाषणं फारचं लाबंली. नको इतकी लांबली. आता कुणाची लांबली ते तुम्हीच विचार करा, असं म्हणत अजित पवारांना कोपरखळी मारली.
विधानसभेतही मुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्प येतोय, हे भाषणात सांगितलं होतं. तुम्हीच सांगता येतोय आणि आता टक्केवारीचा आरोप करताय. हे निरर्थक आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावं, कोणी टक्केवारी मागितली ते. हे सगळं धादांत खोटं आहे, असं आव्हानच अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं.