टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 मे 2021 – कोरोनाच्या नव्या लाटेमध्ये RT-PCR चाचणीत संसर्गाचा थांगपत्ता लागत नाही, अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा काही रुग्णांना सिटी स्कॅन करावे लागते. परंतु सिटी स्कॅन विचारपूर्वक करायला हवेत. सीटी स्कॅन हे सुमारे तीनशे छातीच्या एक्स-रेच्या समतुल्य असून ते अत्यंत हानिकारक आहे, असे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
घरातील विलगीकरणातील लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधतात. सॅच्युरेशन 93 किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणासारखी स्थिती आहे. आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असा सल्ला देखील रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.
अधिक बाधित राज्यांव्यतिरिक्त काही राज्यामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, मणिपूर व मेघालय ही राज्ये बाधित आहेत, अशी माहिती देखील गुलेरिया यांनी दिली आहे.
रिकव्हरी रेट चांगला आहे :
कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील सुधारत असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. 2 मे रोजी रिकव्हरीचे प्रमाण 78 टक्के होते, जे 3 मे रोजी 82 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. काही गोष्टीवर आपल्याला सतत काम करावे लागेल. दिल्ली व मध्य प्रदेशामध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. मंत्रालयाने असे म्हटले आहे की, जर आपण संपूर्ण देशातील कोरोना मृत्यूदर पाहिला तर ते साधारणतः 1.10 टक्के आहे.