बीड: मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लोकशाही मध्ये मंत्र्यांनी किंवा मंत्र्याच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी काय टीका करावी हे महत्वाचे नाही. पण मंत्रीपदावर आल्यावर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मंत्री तानाजी सावंत बोलले तोच समाज त्यांचे मंत्रीपद कायमचं काढून घेऊ शकते, हे मात्र नक्की आहे. सत्तेत आलं की मराठा क्रांती मोर्चाबद्दल बोलायचे. त्यांचा अपमान करायचा. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आले नाही. बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं. अशी प्रतिक्रिया आमदार धनंजय मुंडे यांनी बीड मध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मराठा आरक्षणाविषयी बोलताना तानाजी सावंत यांच्याकडून आक्षेपार्ह वक्तव्य बोलण्यात आले. त्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी माफी देखील मागितली. मात्र, माफी मागितल्यानंतरही तानाजी सावंत यांच्यावर विविध नेत्यांकडून टीका केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याचा निषेध करत टीका केली आहे.