मुंबई : महाराष्ट्रात प्रेस कॉउंसिल ऑफ इंडियाच्या (Press Council of India) धर्तीवर महाराष्ट्र प्रेस कॉउंसिल निर्माण करून माध्यम क्षेत्राशी निगडीत सर्व विषय एका छत्राखाली आणावेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली आहे.
नीती आयोगाच्या (NITI) धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. त्याच पध्दतीने प्रेस कॉउंसिलच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री (Former CM Vilasrao Deshmukh) असताना असा प्रयत्न झाला होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तो अंमलात येऊ शकला नाही. राज्यात शाखा सुरू करायला प्रेस कॉउंसिलचा विरोध असल्याचे तेव्हा सांगण्यात आले. मात्र, प्रेस कॉउंसिल हे नाव न वापरता वेगळ्या नावाने ही व्यवस्था निर्माण करता येऊ शकेल, अशी सूचना देखील देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) पाठविलेल्या पत्रात केली आहे.
प्रेस कॉउंसिल ऑफ इंडियाला अनेक अधिकार आहेत. मात्र, अलिकडे ही व्यवस्था निष्प्रभ झाल्याने पांढरा हत्ती म्हणूनच या व्यवस्थेचा उल्लेख आता केला जातो. माध्यम स्वातंत्र्याचे रक्षण करण्याबरोबरच एखादे माध्यम चुकीच्या पध्दतीने काम करत असेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचे काम देखील प्रेस कॉउंसिलने करावे अशी अपेक्षा असते मात्र हे होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अशी व्यवस्था निर्माण करून त्यांना पूर्ण अधिकार दिले तर अनेक समस्या संपुष्टात येतील असेही देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.