आंधळे… बहिरे.. मुके झालेल्या मोदीसरकारला महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांच्या व्यथा दिसत नाही म्हणूनच शेतकरी त्यांच्या वाढदिवशी आत्महत्या करत असून आता तरी मोदी सरकार जागं होणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला. (NCP Spokesperson Mahesh Tapase) तर कल्याण – डोंबिवलीतील लहान मुलींवरील अत्याचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi birthday) यांच्या वाढदिवशी महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या केली आहे आणि तसा उल्लेख त्या शेतकऱ्याने केला आहे. देशातील लोकांना अन्न पुरवणारा आपला अन्नदाताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आत्महत्या करतो ही शोकांतिका आहे असेही महेश तपासे म्हणाले.
कल्याण – डोंबिवलीमध्ये महिला अत्याचार व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यामागे भाजपच्या नेत्याचा हात असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सांगितले.
पोस्कोअंतर्गत कारवाई आणि तडीपारी असताना भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी व त्याचा भाऊ कुंदन माळी हे हैदोस घालून दहशत निर्माण करत आहेत मात्र त्यांना पोलीसही पाठिशी घालत आहे, असा आरोपही विद्या चव्हाण यांनी केला. यावेळी विद्या चव्हाण यांनी संदीप माळी यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती सादर केली.
सराईत गुन्हेगार संदीप माळी व कुंदन माळी या गुन्हेगारांना शिंदे सरकार पाठीशी घालण्याचे काम करत आहे. लहान शाळकरी मुलींवर अत्याचार केल्यानंतर संदीप माळीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला मात्र या गुन्ह्यात त्याला जामीन कसा मिळाला असा प्रश्न विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला.
ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ब्रम्हा माळी यांना खंडणीसाठी याच लोकांच्या गुंडांनी मारहाण केली मात्र त्यांना अटक करण्याऐवजी ब्रम्हा माळी यांच्यावरच पोलिसांनी कारवाई केली. याबाबत तक्रार करुनही दखल घेतली गेली नाही. राज्याचे गृहखाते करतेय काय? भाजप पदाधिकार्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करतेय? असा संतप्त सवालही विद्या चव्हाण चव्हाण यांनी केला.