राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून केला जातो. यातच आता बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या (CM Ekanath Shinde tweets) माध्यमातून दिली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना (Ajit Pawar Baramati) चांगलाच धक्का दिला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अजित पवार यांनी बारामतीला बिबट सफारी उभारण्याची घोषणा केली होती, अर्थसंकल्पात तशी तरतूदही करण्यात आली होती. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडीखेल याठिकाणी 100 हेक्टर जागा या प्रकल्पासाठी राखीव ठेवली होती तसेच साधारण 60 कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती.
परंतु, आता सत्ता बदल झाल्याने अजित पवार यांनी घेतलेला बिबट सफारी प्रकल्प बारामतीला उभारण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती तालुक्यातील कुरण गावातील बिबट सफारी केंद्र हे आता जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या गावात होणार असल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली.
बारामतीची बिबट सफारी जुन्नरला गेल्यानंतर बारामतीत टायगर सफारी होणार का? किंवा ती देखील दुसरीकडे हलवण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही