आगामी मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजू लढा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah Mumbai Tour) हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या 200 पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडून (BJP Mumbai) आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
भाजपने अमित शाह यांच्या उपस्थितीत एकप्रकारे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे आणि ‘मिशन मुंबई’ ला सुरुवात केली आहे. अमित शाह यांनी मुंबईत गणेश दर्शन केल्यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आक्रमक भाषण केले. ‘संपूर्ण देशाला चाणक्य कोण आहेत हे माहीत आहे आणि चाणक्य म्हणजे अमित शाह आहेत,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटली निवडणूक आहे असे समजा. अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले. ‘मिशन मुंबई’ साठी सर्व पदाधिकरी, नगरसेवक भाजपा कार्यकर्त्याचे महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीसांनी म्हटले. वॉर्ड रचना काय होईल, कसा प्रभाग असेल याचा विचार करून चालणार नाही, काम करत रहावे असेही त्यांनी म्हटले.
अमित शाह यांच्या या दौऱ्यामुळे भाजपमध्ये मात्र चैतन्य आल्याचे पाहायला मिळाले.