TOD Marathi

राज्यात पावसाचा (Rain) जोर काही अंशी कमी झाला असला तरी काही ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईसह पुणे, ठाणे परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील दोन दिवस कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

पुढील दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे परिसरात कालपासूनच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. गेल्या वर्षी रेंगाळलेला मान्सून (Monsoon) यावर्षी मात्र 15 दिवस आधीच निरोप घेण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरु करेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. एरवी मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून सुरु होतो आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. यावर्षी मात्र 15 दिवस आधीच मान्सून निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.