मुंबई :
शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete death) यांचं काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी राजकीय आणि सामाजिक व्यासपीठांच्या माध्यमातून लढा देणाऱ्या विनायक मेटेंच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विनायक मेटे यांच्या निधनाने कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे. अशामध्येच शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकारिणीची गुरुवारी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमुखाने आगामी काळात शिवसंग्राम पक्षाचं नेतृत्व दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी करावं, असा ठराव करण्यात आला आहे.
विनायम मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात कार्यकर्त्यांचं जाळ तयार केलं आहे. मात्र विनायक मेटे यांच्या निधनाने पक्षसंघटनेचं पुढे काय होणार,असा प्रश्न उपस्थित झाला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसंग्रामच्या कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी यापुढे शिवसंग्राम पक्षाचं नेतृत्व करावं, तसंच भाजपने त्यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून केली आहे.
सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेल्या विनायक मेटे यांनी पुढे शिवसंग्राम पक्षाची स्थापना केली. भाजपच्या मदतीने ते विधानपरिषदेवरही गेले होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपली. त्यामुळे मेटे यांना ‘सरप्राइज गिफ्ट’ दिलं जाईल, असं म्हणत भाजप नेतृत्वाने त्यांना पुन्हा विधानपरिषद आमदार म्हणून संधी देण्याचे संकेत दिले होते. तेव्हा भाजपने विनायक मेटे यांना दिलेल्या या आश्वासनाची पूर्तता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Vinayak Mete) यांनी विधानपरिषदेवर घेऊन करावी, अशी मागणी देखील शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, मेटे यांच्या अपघातानंतर ड्रायव्हरकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये तफावत आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही या अपघात प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी याबाबत भूमिका मांडण्याआधी कार्यकारिणीतील सदस्य अथवा ज्योती मेटा यांच्याशी चर्चा करावी, असं आवाहनही शिवसंग्रामकडून करण्यात आलं आहे.