TOD Marathi

मुंबई : मुंबईत आता लंडनमध्ये फिरण्याचा फील येणार आहे. आता मुंबईकर देखील डबल डेकर एसी बसमधून (Double Decker AC Bus) प्रवास करू शकतील. या बसची खास गोष्ट म्हणजे या बस इलेक्ट्रिक आहेत. या बसेसमुळे पर्यावरणास कोणतीही हानी पोहोचणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत या बसेसचं अनावरण केलं. मुंबई लोकलनंतर मुंबईतली बेस्टची बस सेवा ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन मानली जाते. या बेस्टच्या ताफ्यात आता हळूहळू इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जात आहेत.

काही इलेक्ट्रिक एसी आणि नॉन एसी बसेस मुंबईच्या रस्त्यांवर आता धावत आहेत. यात आता इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बसची एंट्री झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे.

मुंबईत इलेक्ट्रिक (Mumbai Electric) डबल डेकर एसी बस चालवण्यामागे बेस्टची अनेक कारणं आहे. पर्यावरणास अनुकूल अशा या बसेसद्वारे बेस्ट अशा प्रवाशांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे, जे लोक चांगल्या सुविधांसाठी टॅक्सी किंवा ऑनलाईन कॅब सर्व्हिसचा वापर करतात. यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या हाय एंड बसेसचं तिकीट नेहमीच्या बसपेक्षा जास्त असेल. परंतु टॅक्सीच्या तुलनेत या बसचं तिकीट स्वस्त असेल. त्यामुळे या बसेसना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बस चालवण्याचा बेस्ट प्रशासनाला देखील फायदा होईल. इंधनावर होणाचा खर्च कमी होईल, प्रदूषण कमी होईल. तसेच या बस एकाच वेळी जास्तीत जास्त प्रवाशांना घेऊन प्रवास करू शकतील. त्यामुळे बेस्टला जास्त प्रवासी मिळतील. सप्टेंबरपासून या बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. पहिल्या टप्प्यात ३० ते ४० बसेस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जाणार आहोत. येत्या तीन ते चार महिन्यात या बस मुंबईत दाखल होतील.