नागपूर:
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत आहेत. भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहे. राज्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर सरकार आले पाहिजे, त्यासाठी काम करण्याची गरज आहे, असा नड्डा ( J P Nadda) यांच्या बोलण्याचा अर्थ होता, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
जे पी नड्डा यांनी केलेल्या प्रादेशिक पक्ष संपतील या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. भाजपाला संघराज्य पद्धत संपवायची आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. जनतेला हे मान्य आहे का, यावर निवडणुका व्हायला हव्यात असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
देशातील लोकशाही मृतावस्थेत असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धवजींनी आता काही काळ शांत बसावे आणि आम्ही कसं काम करतो ते पाहावे असा सल्लाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. उद्धवजी म्हणतात आमची शिवसेना संपू शकत नाही. मात्र शिवसेना ते स्वतःच संपवत आहेत, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. या सगळ्याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, असेही ते म्हणालेत. हे सगळं उद्धव ठाकरे नैराश्यातून बोलत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.