पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केलेल्या संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांना आज परत कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी राऊतांना जामीन मिळणार की कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊतांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करण्याची शक्यता आहे.
पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे?
गेल्या २००६ मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. २००८ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. पण, दहा वर्षानंतरही पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ ६७८ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला १ हजार ३४ कोटींचा चुना लावला होता. बिल्डरने विक्रीसाठी असलेले क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप या बिल्डरवर होता. ही गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक राकेश वाधवान आहे.
प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. त्यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये गेले होते. पण, हे पैसे १० वर्षानंतर परतही करण्यात आले. हे पैसे कर्जाच्या स्वरुपात घेतले होते, असा दावा संजय राऊतांच्या पत्नीने केला होता. मात्र, संजय राऊतांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने संजय राऊतांच्या कुटुंबीयांवर छापेमारी केली होती. याच घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांची मालमत्ता देखील जप्त केली आहे.