नाशिक : भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाना साधला आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावावर पैसे खाणाऱ्या या भामट्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अजूनही पक्षात ठेवणार का? असा सवाल तुषार भोसलेंनी विचारला आहे. संजय राऊत यांना ईडीने अखेर अटक केली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सतरा तास झाडाझडती केल्यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) संजय राऊतांवर कारवाई केली.
तुषार भोसले म्हणाले की “संजय राऊतांच्या घरी ईडीला साडेअकरा लाख रुपये सापडले. त्यापैकी दहा लाख रुपयांच्या नोटांच्या बंडलावर अयोध्या असं लिहिलं होतं. त्याच्याबाबत त्यांचे भाऊ सुनील राऊत म्हणतात, की शिवसेनेने जो अयोध्या दौरा आयोजित केला होता, त्यासाठी शिवसैनिकांनी जे पैसे गोळा केले होते, त्यातील उरलेले हे पैसे आहेत.”
“एके काळी राम मंदिराच्या निधी संकलानवर टीका करणारे संजय राऊत, संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांवर त्यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे संजय राऊत, शिवसैनिकांनी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी एकत्र केलेल्या पैशातील दहा लाख रुपये स्वतःच्या घरात दडवून ठेवतात. असे हे रामद्रोही संजय राऊत समस्त हिंदू समाजाला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. नियती त्यांना माफ करणार नाहीच, पण आमचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना आहे, रामाच्या नावावर पैसे खाणारा हा भामटा अजूनही मोठा करणार आहात का आणि त्याला पक्षात ठेवणार आहात का?” प्रश्नही आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला आहे.
दहा लाखांची रोकड कुठून आली?
संजय राऊत यांच्या घरात दहा लाख रुपयांची जी कॅश सापडली, त्याच्यावर ताबा घेतला, त्यावेळी लिहिलं होतं अयोध्या आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde). ते (शिवसेना नेते) अयोध्याला गेले होते, त्याचं काँट्रिब्युशन होतं, ते पक्षाचे पैसे आहेत आणि पक्ष कार्यालयात जमा होणार होते. आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. तुम्ही रामायण-महाभारत बघा, सत्याचाच विजय होतो. संजय राऊत यांना काही दिवसात न्याय मिळेल, भाजप राऊतांना घाबरली म्हणून अटक केली, असा दावा संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता.