वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत आलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी गेले तर मुंबईत पैसा उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. त्यावरुन आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपण हा विषय संसदेत मांडणार असल्याचं सांगितलं आहे. (Supriya Sule on Governor Bhagatsingh Koshyari Statement)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे.त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे. राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही ‘आमची मुंबई ‘ आहे, असं ट्वीट खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते.याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे. pic.twitter.com/0fzigFkhKe
— Supriya Sule (@supriya_sule) July 30, 2022
तर माध्यमांशी बोलतानाही खासदार सुळे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते. राज्यपालांचं वागणं हे वेदना देणारं असतं. राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे. त्यांनी राजकारणात न पडता केवळ राज्याला मार्गदर्शन करणं हेच त्यांचं काम असतं. पण सातत्याने ते महाराष्ट्राचा, इथल्या माणसांचा, महापुरुषांचा अपमान करत असतात. मी सोमवारी दिल्लीला जाणार आहे. तिथे संसदेत मी हा मुद्दा उपस्थित कऱणार आहे आणि भारत सरकारकडे त्यांना परत बोलवून घेण्याची आणि राजीनामा घेण्याची मागणी करणार आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणावर भाष्य करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी हे प्रकरण तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घालावं. पत्र वगैरे लिहिण्याची गरज नाही. तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. तातडीने जिथे असतील तिथून बोलावं, ट्वीट करावं आणि राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांना माहिती द्यावी. हे सरकार आणि राज्यपाल असंवेदनशील आहेत. ते सतत महाराष्ट्राचा द्वेष करतात. महाराष्ट्राच्या विरोधात ते आहेत, असंही त्या म्हणाल्या.