शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेत प्रवास पाहता छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत शिवसेनेत फूट पाडली. मात्र, कोणालाही शिवसेनेत शिंदेंसारखी फूट पाडता आली नाही. (Chhagan Bhujbal, Narayan Rane, Raj Thackeray, Eknath Shinde) यासंदर्भात सवाल संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. संजय राऊतांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी केली आहे. (Uddhav Thackeray Interview)
उद्धव ठाकरे यांचं उत्तर ?
याचं कारण असं आहे की, ज्यांना मी अधिकार दिले होते त्यांनीच माझा विश्वासघात केला. त्यावेळी लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते, पण मला कुजबूज ऐकू यायची की, काय हे मुख्यमंत्री आहेत… नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे. मलईदार खातं आहे म्हणतात. पण मी ते खातं माझ्याकडे न ठेवता विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलं होतं. मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक म्हणजे सामान्य प्रशासन, दुसरे न्याय व विधी. होय, आयटीही ठेवलं, कारण खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का? हा माझा विचार होता.
असे उत्तर देत त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
भाजप आणि शिवसेना यांच्यातील २०१४ ते २०१९ मधील युतीच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं. तर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं होतं.