मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच यासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांना एक पत्र लिहिलं आहे. (Declare Wet Drought in Maharashtra and Call a Special Session, Demands Ajit Pawar)
राज्यात यंदा विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आणि यामुळं शेतीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं तब्बल ८ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कोसळू लागला असून मराठवाडा, विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसामुळे दाणादाण उडाली.
पूरग्रस्त जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतांचं, पिकांचं मोठं नुकसान झालं. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याचीही शक्यता आहे. यंदाच्या वर्षी १५२ लाख हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सून आला, मात्र नियमित पाऊस नव्हता. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात यायला खूप वेळ लागला. या काळात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न कऱण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र पेरणीनंतर आलेल्या जोरदार पावसाने आणि पुरामुळे पिकं अक्षरशः पाण्यात गेली. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात पुढच्या सात दिवसांमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.