नवी दिल्लीः
राज्यातील सत्तासंघर्ष आता दिल्लीत सुरू झाला आहे. शिवसेनेचे १२ खासदार आता शिंदे गटासोबत गेले आहेत. (12 MP of Shivsena joins Shinde group) शिवसेनेच्या स्वतंत्र गट नोंदणीसाठी लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी पत्र दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत हे सर्व बारा खासदार उपस्थित होते. या गटाच्या वतीने लोकसभेत गटनेतेपदी राहुल शेवाळे (Rahul Shewale) तर मुख्य प्रतोदपदी भावना गवळी (Bhavana Gawali) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर इतर अकरा खासदारदेखील उपस्थित होते. (12 MP of Shinde group met Loksabha speaker Om Birla)
“बारा खासदारांचा नवीन गट नोंदणी करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. माझ्याबरोबर आलेल्या खासदारांचे स्वागत करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही भाजपबरोबर आले. आम्ही सार्वत्रिक निवडणुकाही एकत्र लढलो. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर आलो आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेला जनतेचा पाठिंबा असून, हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. तर आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत शिंदे गटाने संसदेतील सेना कार्यालयावरही दावा सांगितला आहे. (Eknath Shinde PC in Delhi)
वेगळ्या गटाची मागणी केलेल्या खासदारांमध्ये कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबईचे राहुल शेवाळे, हिंगोलीचे हेमंत पाटील, बुलडाण्याचे प्रतापराव जाधव, रामटेकचे कृपाल तुमाणे, यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी, मावळ (पुणे)चे खासदार श्रीरंग बारणे, कोल्हापूरचे संजय मंडलिक, हातकणंगलचे धैर्यशील माने, शिर्डीचे सदाशिव लोखंडे, नाशिकचे हेमंत गोडसे, पालघरचे राजेंद्र गावित अशे १२ खासदार शिंदेंबरोबर गेले आहेत.