नवी दिल्ली :
आधी बंड, नंतर राज्यात सत्ता, मुख्यमंत्रीपद आणि आता लोकसभा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एकएक पाऊल पुढे पडत आहे. एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. (CM Eknath Shinde on Delhi tour) शिवसेनेच्या १२ खासदारांच्या समर्थनानंतर संसदेतील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्याच्या हालचाली एकनाथ शिंदे यांनी सुरु केल्या आहेत. शिंदे गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलंय. यामध्ये आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत शिंदे गटाने संसदेतील सेना कार्यालयावर आपला दावा सांगितलेला आहे.
आमदार-पदाधिकारी कार्यकर्त्यानंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. नवी दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. (12 MP Shivsena supported Eknath Shinde) त्या पूर्वी शिंदे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. परंतु शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने काही महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. मुख्य प्रतोद यांच्या नावाने पत्र द्या, असं लोकसभा सचिवालयाने शिंदे गटाला सांगितल्याची माहिती आहे. दुसरीकडे लोकसभेत गटनेते खासदार विनायक राऊत शिंदे गटासोबत नाहीत त्यामुळे खासदार राहुल शेवाळे यांना गटनेता नेमण्याच्या हालचाली सुरु आहेत.
शिवसेनेचा आपलाच गट अधिकृत आहे, हे सांगण्यासाठी शिंदे गटातल्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्याच पत्रात त्यांनी आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत संसदेतील सेना कार्यालयावर दावा सांगितलेला आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Loksabha Speaker Om Birla) या पत्रावर काय निर्णय देतात, हे पाहावं लागेल.
शिवसेनेचे हे १२ खासदार एकनाथ शिंदे गटासोबत
१. श्रीकांत शिंदे – कल्याण
२. राहुल शेवाळे – दक्षिण मध्य मुंबई
३. हेमंत पाटील – हिंगोली
४. प्रतापराव जाधव – बुलडाणा
५. कृपाल तुमाणे – रामटेक
६. भावना गवळी – यवतमाळ-वाशिम
७. श्रीरंग बारणे – मावळ
८. संजय मंडलिक – कोल्हापूर
९. धैर्यशील माने – हातकणंगले
१०. सदाशिव लोखंडे – शिर्डी
११. हेमंत गोडसे – नाशिक
१२. राजेंद्र गावित – पालघर