मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव ते गेल्या काही दिवसात मनसे पदाधिकाऱ्यांना भेटू शकले नव्हते. (MNS Chief Raj Thackeray) मात्र, त्यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते 13 जुलैला वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा एक मेळावा घेणार होते. या मेळाव्याला महाराष्ट्रभरातून मनसैनिक हजेरी लावणार होते, परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक तातडीचे पत्र काढत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. (Raj Thackeray writes a letter to MNS party ledaers and activists) मनसेचा उद्या होणारा हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र पावसाची परिस्थिती आहे, या पार्श्वभूमीवर आपण हा मेळावा पुढे ढकलत असून स्थानिक ठिकाणी आवश्यक ती मदत करावी, विशेषतः नदी काठावरील गावांना ज्या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी मदत करावी, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. या मेळाव्याची पुढील तारीख किंवा माहिती लवकरच आपल्याला कळवण्यात येईल. (MNS postponed public meeting which was to be taken in Mumbai)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांठी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे पत्र.#MNSAdhikrut pic.twitter.com/oDcj7AKehu
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 12, 2022
राज ठाकरे पत्रात म्हणतात,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी
सस्नेह जय महाराष्ट्र !
तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे.
आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे.
अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.
दरम्यान तुम्ही स्वतःची काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली-कोल्हापूरकडचा आत्ता- आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुद्ध पाणी, अंथरून-पांघरून (सर्वत्र ओल असते) पूरवावं लागेल. मुख्यतः वृद्ध, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडे उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत.
एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका.
अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं.
लवकरच भेटू
आपला नम्र
राज ठाकरे