नवी दिल्ली: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. (CM Ekanath Shinde and DCM Devendra Fadnavis in Delhi) थोड्याच वेळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. दरम्यान त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. दिल्ली दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि आमच्या पाठिशी समर्थपणे असल्याचं म्हटलं.
यावेळी, उद्धव ठाकरेंच्या परत निवडणुका घ्या, या आव्हानासंदर्भात एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.
राज्यघटनेप्रमाणेच निवडणुका होतील, शिवसेना-भाजप युतीचं हे मजबूत सरकार आहे. एकीकडे 164 आमदारांचे मजबूत सरकार आणि समोर 99 आमदार आहेत. बहुमताचं हे सरकार आहे. त्यामुळे, लोकांनी त्यांची कामे आणि समस्या घेऊन आमच्याकडे यावे. आम्ही लोकांच्या हिताची काम करण्यासाठीच हे सरकार स्थापन केलं आहे, ते आम्ही करत राहू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.