राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९२ नगर परिषदा व ४ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामतीसह अन्य ८ नगर परिषदांचा समावेश आहे. तसेच २ नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींचीही निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने ( Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, मतदान १८ ऑगस्टला तर मतमोजणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यासाठी ५ जुलै रोजी मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी २० जुलैला निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर २२ ते २८ जुलै दरम्यान अर्ज करता येणार आहे. तर २३ व २४ जुलै रोजी सुटी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. २९ जुलै रोजी अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जांची छाननी २९ जुलै रोजी करण्यात येईल. ४ ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. १८ ऑगस्टला मतदान, तर १९ ऑगस्टला मतमोजणी होईल.
या नगर परिषद, नगर पंचायतींसाठी निवडणूक : पुणे (Pune) जिल्ह्यातील बारामती ही अ वर्गातील नगर परिषद, तर खेडमधील चाकण व दौंड या ब वर्गातील नगर परिषदांचा समावेश आहे. तसेच क वर्गातील नगर परिषदांमध्ये खेडमधील राजगुरुनगर व आळंदी आणि इंदापूर, पुरंदरमधील जेजुरी, सासवड व शिरूर या नगर परिषदांचा समावेश आहे. तर नव्याने निर्मित झालेल्या आंबेगावमधील मंचर व बारामतीमधील माळेगाव नगरपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.