राजकारणात अनेक घडामोडी होत असतात. आजवर इतिहासात वेगवेगळ्या पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी झाल्या. पक्षांचे नेते पक्ष सोडून जाणं, महत्वाच्या नेत्यांचं आकस्मिक जाणं, बलाढ्य नेत्यांनाही अडचणीच्या काळातून जावं लागणं, अशा अनेक गोष्टी भारतीय राजकारणात वेळोवेळी आपल्याला दिसून येतील. अशाच कठीन परिस्थितीतून वाय एस आर रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांनाही जावं लागलं. त्यांचा जबरदस्त प्रवास मांडलाय ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी…
वायएसआर रेड्डी (YSR Reddy) यांच्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (CM of Andhra Pradesh) कोण, असा प्रश्न पुढे आला. वायएसआर यांचा काही स्वतःचा पक्ष नव्हता. ते कॉंग्रेसचे नेते. पण, विलक्षण लोकप्रिय. पक्षापेक्षाही मोठे झालेले. अमाप लोकप्रियता आणि तेवढीच अफाट मायाही. २००९ मध्ये विमान अपघातात ते आकस्मिक गेले, तेव्हा अनेकजण त्या धक्क्याने मरण पावले. असली भयंकर लोकप्रियता!
ते वारले, तेव्हा त्यांची बायको आमदार होती. आणि, मुलगा जगनमोहन खासदार होता. (Jagan Mohan Reddy) वायएसआर यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ व्हायचे तर जगनमोहनला मुख्यमंत्री करायला हवे, असे बहुतेक आमदारांचे मत होते. तेव्हा कॉंग्रेस केंद्रात आणि राज्यातही सत्तेत होती. जगनमोहनला मुख्यमंत्री न करण्याचा निर्णय या बलाढ्य पक्षाने घेतला. कॉंग्रेसने अगदीच सामान्य वकुबाच्या लोकांकडे मुख्यमंत्री पद दिले. पण, जगनमोहनला पदापासून दूर ठेवले.
तरूण जगनमोहन काही बोलला नाही. तो आंध्र प्रदेशच्या झंझावाती दौ-यावर निघाला. लोक अक्षरशः वेडे झालेले. शोकव्याकुळ होते. जगनमोहनला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. बाप मेला आणि पोराला डावलले गेले. सहानुभूतीच्या लाटेने रौद्र रूप धारण केले. राज्यभर जगनमोहन फिरत राहिला. तेव्हा तो अवघ्या ३८ वर्षांचा होता.
भयभीत झालेल्या कॉंग्रेसने त्याला ही पदयात्रा थांबवण्याचा आदेश दिला. त्याने जुमानले नाही. तो दौरे करत राहिला. लोकांच्या घरोघरी जात राहिला. लोक त्याला मिठी मारत, पाया पडत, गळ्यात पडून रडत. सगळा हलकल्लोळ झाला. मीडियानेही त्याला उचलून धरले. कॉंग्रेसच्या विरोधात हळूहळू देशभर वातावरण तयार होत होतेच. त्या शक्तींनीही त्याला मदत केली. जगनमोहनने कॉंग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिला. आईनेही आमदारकी सोडली.
वडील गेले. पक्ष सोडला. पद सोडलं. चिन्ह सोडलं.
लढाई होती बलाढ्य पक्षाशी आणि केंद्र सरकारशी.
न डगमगता २०११ मध्ये जगनमोहननं ‘वायएसआर कॉंग्रेस’ नावाचा नवा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. (YSR Congress Party) नंतरच्या पोटनिवडणुकीत त्यानं पराक्रम केला. आई जिंकली. तो स्वतःही जिंकला. कॉंग्रेसने केंद्रीय यंत्रणा त्याच्या मागे लावल्या. आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा पुढे करून त्याला अटक केली. जगन तुरूंगात गेला. त्यानंतर तर तो हीरोच झाला. तेलंगणा निर्मितीला विरोध करण्यासाठी त्यानं तुरूंगात आमरण उपोषण केलं. तो तुरूंगात असताना, बाहेर आई आणि बहीण पदयात्रा करत होत्या. उपोषण करत होत्या. तिकडं तुरूंगात उपोषणामुळं त्याची तब्येत ढासळली. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. यथावकाश तो बाहेर आला. मग त्यानं राज्यव्यापी बंद पुकारला. वातावरण तापवलं. आईनं आमदारकीचा राजीनामा दिला. यानंही राजीनामा दिला. आंध्र प्रदेशच्या हितासाठी लढणारा जगनमोहन हा एकमेव नायक ठरला. तेलुगु अस्मितेचा आवाज झाला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्याच्या झंझावाताने चित्र बदलले. (2014 State assembly election) तोच जिंकेल, असा सर्वांचा अंदाज होता. अर्थात, या निवडणुकीत त्याला सत्ता मिळाली नाही. कॉंग्रेसची सत्ता मात्र गेली. तेलुगु देसमने सत्ता मिळवली. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झाले. जगनमोहन विरोधी पक्षनेता झाला. तो आणखी आक्रमक झाला. त्याने सरकारला धारेवर धरले. पदयात्रा काढल्या. अख्खा आंध्र पिंजून काढला. सभागृहात आणि बाहेरही तो आंध्र प्रदेशच्या जनतेचा आवाज झाला. त्याला खूप त्रास दिला गेला. त्याच्यावर प्राणघातक हल्लाही झाला. पण, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहनची लाट तयार झाली. (2019 State assembly election) त्याने आंध्र प्रदेशच्या इतिहासात विक्रमी अशा जागा मिळवल्या. १७५ पैकी १५७ जागा. आणि, सगळ्यांना भुईसपाट करून तो मुख्यमंत्री झाला.
पक्ष ताब्यातून जाणं, चिन्ह जाणं, विरोधक शक्तिशाली असणं हे काहीही असू द्या. लोक तुमच्यासोबत असतील आणि तुम्ही तो झंझावात तयार करू शकलात, तर तुम्हाला रोखण्याची क्षमता कोणामध्येही नसते. इतिहासाचा हा दाखला आहे.त्यापासून कोण काय शिकतं, हा मुद्दा आहे.