देशासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून एक मोठी क्रांती देशभरामध्ये 5G लॉन्चिंगच्या (5G Launch) माध्यमातून होणार आहे. मुंबई, पनवेल, पुणे यासह महत्वाच्या शहरांमध्ये लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी पनवेलमधील शाळा निवडली याचा अभिमान आहे. 5G मुळे इंटरनेट स्पीड वाढेल, ॲक्युरसी वाढेल, ऑनलाईन शिक्षणाच्या दर्जात वाढ होईल. आपण विकासाकडे जातो आणि यासाठी 5G तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आणि 5G चा मोठा फायदा शिक्षण, आरोग्य, शेती, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या क्षेत्रात होऊन आमुलाग्र बदल घडेल असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हापरिषदेच्या शाळा डिजिटल करायच्या असून 5G सेवेचा मोठा फायदा यासाठी होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
देशभरात काही महत्त्वाच्या शहरांमध्ये आज 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली.