राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या विधानाला सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. काही ठिकाणी तर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अकोल्यामध्ये या विधानाला अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी समर्थन केले आहे. या विधानावर अमोल मिटकरी काय म्हणाले की, भारतीय जनता पार्टी कडून छगन भुजबळ यांच्या विधानाचा एक प्रकारे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्हाला या देशामध्ये प्रथम शिक्षण ज्योतिराव फुले यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या दोघींनी दिले. फुले दांपत्याने शाळा काढल्या आणि त्यांच्यामुळेच सर्व महिला शिकू शकल्या. आपण देवदेवतांची उपासना करतो, त्याबद्दल आदरच आहे आणि यात काही दुमत नाही पण शाळेमध्ये सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पूजन झालं पाहिजे या मताशी विज्ञानवादी प्रत्येक माणूस ठाम आहे आणि त्यांचे वक्तव्य हे विज्ञानाला धरून आणि सुसंगत आहे. असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
तुम्हाला खरच राजकारण करायचं असेल तर अशा गोष्टी करू नका, विकासाचे राजकारण करा कारण मागच्या काळामध्ये तुमचे बोलण्याचे दात आणी खाण्याचे दात वेगळे कसे आहेत हे या प्रकारावरून दिसून येतं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फुले दाम्पत्याबद्दल टिपणी केली होती. त्या विरुद्ध ना चित्राताई बोलल्या ना भारतीय जनता पार्टीचा कोणी नेता बोलला. त्याच्यामुळे उगाच पराचा कावळा करण्याचा प्रयत्न करू नका. भुजबळ साहेब ती व्यक्ती आहेत की ज्या वेळेस देशाचे संविधान दिल्लीत जंतरमंतरवर जाळलं, तेव्हा याविरुद्ध महाराष्ट्रात जागोजागी मनुस्मृतीचे दहन करणारा हा योद्धा आहे. आणि त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत, असेही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटोवरून काही वक्तव्य केले होते, ज्याला भाजपने तीव्र विरोध केला होता. त्यांच्या विरुद्ध काही ठिकाणी निदर्शनही झाली होती. मात्र, त्यानंतर अमोल मिटकरी यांनी भुजबळांच्या त्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे.