पुणे:
कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २३ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालेवाडी (Thirteen international senior kurash tournament in November Balewadi) येथील क्रीडा संकुलात १३ व्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इंटरनॅशनल कुराश असोसिएशन व ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतेने होत असून, भारत देशात कुराश इंटरनॅशनल चॅम्पियनशिप आयोजन करण्याची ही चौथी वेळ आहे, अशी माहिती कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे चीफ पॅट्रोन जगदीश टायटलर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे (Kurash Association of India) अध्यक्ष रमेश पोपली, महासचिव लाल सिंग, खजिनदार धर्मेंद्र मल्होत्रा, कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र पॅट्रोन ऍड.स्मिताताई निकम, तहसीलदार रोहिणी आखाडे, रोहिणी सपकाळ, कुराश महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नगरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे शिवाजी साळुंखे, संजय धोपगावकर, सागर जाधव, गणेश चौधरी, दुष्यन्तराजे देशमुख, वृथा जोशी, संतोष चोरमले आदी उपस्थित होते.
ऍड. स्मिता निकम (Adv. Smita Nikam) म्हणाल्या, “कुराश हा हजारो वर्षांपासून प्रचलित असलेला दोन स्पर्धकांतील युद्धकलेचा प्रकार आहे. यंदा ही स्पर्धा भारतात आणि त्यातही आपल्या पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होत आहे, याचा आनंद वाटतो. या स्पर्धेमध्ये ६० देशांतून ४५० स्पर्धक सहभागी होत आहेत. भारतातून दोन संघ सहभागी होणार असून, ३२ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्त्री व पुरुष अशा दोन्ही गटात, विविध वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे.”