पुणे:
राज्यात सध्या दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून आपापल्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी एकीकडे शिवाजी पार्क आणि दुसरीकडे बीकेसी मैदानावर मेळाव्याला सुरुवात होईल. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची (Shivsena Dasara Melava) भाषणही जवळपास एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाषण ऐकणाऱ्या लोकांना नक्की कोणाचे भाषण ऐकायचे, असा पेच निर्माण होऊ शकतो. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांना तुम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापैकी कोणाचे भाषण पहिले ऐकाल?, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांची भाषणं एकाचवेळी सुरु झाली तर मी प्रथम उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकेन. आणि त्यानंतर टीव्हीवर रिपीट करण्यात येणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन,’ ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दसरा मेळाव्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेशी असलेला ऋणानुबंध शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करेल, असं अजीत पवार म्हणाले. दसरा मेळाव्यावरुन सध्या शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप यासंदर्भातही अजित पवार यांनी मत मांडले. मोठे राजकीय मेळावे केले जातात, तेव्हा कार्यकर्त्यांना बोलावलं जातं. तेव्हा अशा घटना घडत असतात. दोन्ही गटांमध्ये कोणाचा दसरा मेळावा मोठा? यावरुन इर्षा निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करुन आपापला दसरा मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Ajit Pawar speaks over Chhagan Bhujbal statement) यांनी शाळांमध्ये सरस्वती देवीच्या प्रतिमेऐवजी महापुरूषांची छायाचित्रं लावावीत, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्त्वव्यावरुन मोठा वादंग झाला होता. याविषयी अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, ते छगन भुजबळ यांचे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसे मत नाही. मात्र प्रत्येकाला त्याच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
२०१४ मध्ये एकनाथ शिंदे हे अशोक चव्हाणांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन आले होते, या चर्चेविषयी बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला. हे सगळे २०१४ मध्ये घडले आहे, आता आपण २०२२ मध्ये आहोत, थोड्याच दिवसांत २०२३ सुरु होईल. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्यात काही अर्थ नाही. सर्वसामान्य जनतेला या सगळ्या वादांमध्ये रस नाही. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्यं केली जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.