TOD Marathi

आम्ही शिवसेनेच्या कोट्यातील राज्यसभेची एक जागा संभाजीराजे छत्रपती यांना देऊ केली. संभाजीराजे आणि छत्रपती घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेने हे केले. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा नाकारल्याच्या मुद्द्यावरून मराठा संघटना आणि संभाजीराजे छत्रपती समर्थकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमध्यमांशी संवाद साधला. माझा आणि शिवसेनेचा या सगळ्याशी काय संबंध आहे. गेल्या १५ दिवसांतील घडामोडी नीट समजून घेतल्या पाहिजेत. आम्ही शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा संभाजीराजे छत्रपतींना द्यायला तयार झालो. छत्रपती घराण्याचा यापेक्षा अधिक कोणता सन्मान शिवसेनेने करायला पाहिजे होते, हे आता सांगावे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा ही आमची अट नव्हे तर भूमिका होती. कारण राज्यसभेतील जागा ही शिवसेनेच्या कोट्यातील आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मालोजीराजे हे एका पक्षाकडून आमदार होते. तर संभाजीराजे स्वत: राष्ट्रवादीकडून लढले होते. त्यामुळे छत्रपती घराण्यातील व्यक्ती राजकीय पक्षात जात नाहीत, हा दावा चुकीचा आहे. देशभरातील अनेक घराणी कुठल्या ना कुठल्या पक्षात राहून सामाजिक कार्य पुढे नेत आहेत. आम्ही संभाजीराजे यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी ४२ मते द्यायला तयार होतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.