टिओडी मराठी, पुणे, दि. 4 ऑगस्ट 2021 – सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हे दोघेही पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागामध्ये करणार काम करणार आहेत. आज पुण्यातील राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयामध्ये या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमी पक्षात औपचारिक प्रवेश केला, असे राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि राष्ट्रवादी चित्रपट आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
रघुवीर खेडकर हे तमाशा फडमालक आणि कलाकारांची संघटना असलेल्या ‘अखिल भारतीय तमाशा परिषदे’चे अध्यक्ष आहेत. तर, मंगला बनसोडे ह्या या संघटनेच्या कार्याध्यक्ष आहेत.
या दोघांचा विधिवत प्रवेश लवकरच पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते प्रमुख्याने उपस्थितीत राहणार आहेत.
मुंबईमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनेक तमाशा फडमालक आणि कलाकाार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांचा परिचय –
मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर हे दोघेही तमाशा क्षेत्रातील नामवंत कलाकार आहेत. मंगला बनसोडे यांचा प्रत्यक्ष वारसा ‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा आहे.
मंगला बनसोडे, संध्या माने आणि मालती इनामदार या तिन्ही लेकी महाराष्ट्राला विठाबाईंनी दिल्या आहेत. या तिघींनीही आपापले फड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवलेत.
तर रघुवीर खेडकर हे तमाशा फडातील ‘सोंगाड्या’ची भूमिका करणारे कलावंत आहेत. ते तमाशा फडचालकही आहेत. रघुवीर खेडकर हे सध्या तमाशा फडमालक आणि कलाकारांच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘अखिल भारतीय तमाशा परिषद’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या तरूण वयात त्यांनी बोर्डावर केलेलं थाळीनृत्य अप्रतिम असं होतं. त्यांचं हे नृत्य कथ्थक आणि लोककलेचे मिश्रण असे.
राष्ट्रवादी चित्रपट विभागात वाढलं कलाकारांचं ‘इनकमिंग’ –
महाराष्ट्र राज्यात शिवसेना आणि मनसेच्या चित्रपट आघाड्या सक्रिय आहेत. मात्र, मागील दोन वर्षांत राष्ट्रवादीने चित्रपट क्षेत्रात आपलं संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवलेत.
अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीत मराठी-हिंदी चित्रपट क्षोत्रातील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री, गायक-गायिका प्रवेश करत आहेत.
पक्षाच्या चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणे येथील बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती केलेली आहे. पाटील यांनी पक्षाची चित्रपट आघाडी मजबूत करण्यासाठी अनेक सुप्रसिद्ध कलाकारांना पक्षाशी जोडलंय.
ज्येष्ठ अभिनेत्री सविता माल्पेकर, प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना सुरेखा कुडची यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी आतापर्यंत राष्ट्रवादी चित्रपट आघाडीत प्रवेश केलाय.